लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची: नाना पटोले

Nana Patole:- देशात मागील १० वर्षापासून अत्याचारी, जुलमी, हुकूमशाही पद्धतीने काम केले जात आहे. भाजपाचे सरकार हे जनतेच्या मुलभूत प्रश्नांनाही महत्व देत नाही. संविधानीक व्यवस्था मोडीत काढून मनमानी कारभार सुरु आहे. लोकशाही व संविधान पायदळी तुडवले जात आहे. देशासमोर आज मोठे आव्हान असून याचा मुकाबला करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक संस्थांची भूमिकाही महत्वाची आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे विविध सामाजिक संस्थांची एक बैठक पार पडली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत २० मार्च रोजी होत आहे. या यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सामाजीक संस्थांनी सर्व समाज घटकांशी संवाद साधून तयार केलेला जनतेच्या विकासाचा जाहिरनामा त्यांना सुपूर्द केला जाणार आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, विश्वास उटगी, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष तंवर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, पत्रकार भाग्यश्री पांडे, पत्रकार डॉ. सलीम खान आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, विविध समाज घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी जातनिहाय जनगणना महत्वाची आहे. परंतु केंद्रातील भाजपा सरकार जनगणनाच करत नाही. देशातील १४० कोटी लोकसंख्येपैकी ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जाते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगतात. म्हणजे देशातील ८० कोटी जनता गरिब, पीडित व वंचित आहे. भाजपा सरकार जनतेला गुलाम बनवत आहे, म्हणूनच शिक्षणापासूनही वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचाराचे राज्य आहे, जेव्हा या विचाराला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा याच विचाराचे लोक संविधान व लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पुढे येतात. जनतेमध्ये भाजपा सरकारविरोधात प्रचंड संताप असून जनता निवडणुकीची वाट पहात आहे. भाजपाला त्यांची जागा दाखवण्याचे काम ही जनताच करेल, असेही नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी