‘नाही ताई नाही’, चाकणकरांनी राजीनाम्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांचा गोंधळ

मुंबई : धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यभरात महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आवाज बुलंद करणाऱ्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने पक्षाच्या पदाची सूत्रे त्यांनी सोडली असल्याचे सांगण्यात आले.

चाकणकर यांनी पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. यावेळी त्यांनी उत्तम कामगिरी पार पडल्याने त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. पुढे राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्याने तेथे चाकणकर यांना संधी मिळाली.

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात रुपाली चाकणकर यांनी राजीमाना दिल्याची घोषणा केली आहे. मात्र रुपाली चाकणकर आणि राजीनामा देत असल्याची घोषणा करताच महिला कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ करत राजीनामा न देण्याची विनंती रुपाली चाकणकरांना केली आहे. तुम्ही राजीनामा देणार असाल तर आम्ही सगळ्या राजीनामा देतो अशी भूमिका राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. मात्र राज्य महिला आयोगाचे काम निपक्षपणे करण्यासाठी राजीनामा देत असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.