जुन्नरच्या संशोधन व विकासासाठीच ‘रुसा’ने एक कोटी रुपयांचा अनुदान प्रकल्प सोलापूर विद्यापीठास दिला!

सोलापूर – जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभाग आणि डेक्कन अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त माध्यमातून जुन्नरच्या संशोधन व विकासासाठी रुसा आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली काम चालू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभाग आणि डेक्कन अभिमत विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागाच्या अभ्यासकांनी संयुक्तपणे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडे जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाचा संशोधन व विकास करण्यासाठी एक कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी ‘रुसा’ने तो प्रकल्प मंजूर करून राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यावर सोलापूर विद्यापीठ आणि डेक्कन विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांकडून संशोधन सुरू आहे, त्याचबरोबर तेथील डाटा कलेक्शनचेही काम चालू आहे. याचबरोबर पुरातन वस्तू , शिल्प यांचे संग्रहालयदेखील उभारण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जात आहे.

केंद्र शासन, राज्य शासनाच्या ‘रुसा’ विभागाचे प्रमुख अधिकारी, जुन्नर येथील अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दोन्ही विद्यापीठातील संशोधकांच्या संशोधनानुसार तसेच पुरातत्व धोरणानुसार सर्व काही काम चालू आहे. यामुळे सोलापूर विद्यापीठ व डेक्कन विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधकांना संशोधन व या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. खूप चांगले व मोठे कार्य जुन्नर येथे होत आहे. केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी या कार्याचे कौतुक करत आहेत. अतिशय पारदर्शी व स्वच्छ काम येथे झाल्याची माहिती पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील यांनी दिली.

सोलापूर विद्यापीठाचा बहुमान

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागातील संशोधकांना जुन्नर येथील प्रकल्प राबवण्यासाठी एक कोटी रुपयांचा अनुदान मिळाला. ‘रुसा’कडून एक कोटी रुपये अनुदान आपल्या विद्यापीठास मिळणे व त्यातून आपल्या विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधकांना काम करण्याची संधी मिळणे, ही विद्यापीठासाठी अतिशय भूषणावह गोष्ट आहे. खूप मोठे कार्य तिथे झालेले दिसून येईल. केंद्र व राज्य शासनाच्या रुसाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार व अतिशय पारदर्शीपणे टेंडरची प्रक्रिया झाली. त्या माध्यमातून कामे होते आहेत. मात्र काही लोकांना चांगले कार्य व प्रगती पाहवत नाही. शासनाचे काम असताना सोलापूर विद्यापीठाकडे निधी वळवण्याची कोणतेही अधिकार असू शकत नाही. कुठलीही ठोस माहिती नसताना काही लोकांनी माध्यमात चुकीची माहिती देऊन समाजास दिशाभूल करत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे.असं मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.