पवार साहेबांनी आपले खुजेपण सिद्ध केले; पुरंदरेंवरील टीकेचा सदाभाऊ खोत यांनी घेतला समाचार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय दुसऱ्या कोणीही केला नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मांडलं आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असून या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले, काही लोकांनी शिवचरित्राबाबत अर्धवट आणि धादांत खोटी माहिती पसरवली. त्यातील काही पुस्तके महाराष्ट्रात खूप खपली. घराघरांत ठेवली गेली. त्यात बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचंही पुस्तक होतं. मात्र, माझ्या मते पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय केला आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून शरद पवारांवर पुन्हा एकदा जातीयवादाचा आरोप होऊ लागला आहे काहींनी हे वक्तव्य त्यांनी ब्राह्मणद्वेषातून केल्याचं म्हटले आहे. तर काहींच्या मते आगामी निवडणुका समोर ठेवून पवार यांनी हे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप (BJL) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ते म्हणाले, पवार साहेबांना मधूनच बाबासाहेब पुरंदरे आठवतात कारण दोन महिने झाले पवार साहेबांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद लावला नाही. महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवार साहेबांना नेहमीच समाधान मिळालेले आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी यावरून पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अख्खी हयात शिवचरित्र लिहिण्यात घालविली त्यांची उंची मोजायचा प्रयत्न पवार साहेबांनी करून आपले खुजेपण सिद्ध केले असं म्हणत खोत यांनी टीका केली आहे.