ज्या दिवशी आम्ही धरण फोडू त्या दिवशी जो लोंढा येईल त्यात…; शीतल म्हात्रे कडाडल्या

  आज तूमच्या सोबत मूठभर लोक आहेत. उद्या चिमूटभर असतील आणि मग चिमटीतही येणार नाहीत एवढीच शिल्लक असतील  

Mumbai – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी दैनिक ‘सामना’ला परखड मुलाखत दिली आहे. खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केलं. इंडिया आघाडीवर आपली भूमिका मांडली. तसेच इर्शाळगड दुर्घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. याच मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि  शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, या मुलाखतीत ठाकरेंनी सोडून गेलेल्या नेत्यांना खेकड्याची उपमा दिली. ते म्हणाले, आमचं सरकार वाहून नव्हतं गेलं. खेकड्यांनी धरण फोडले. खेकडे धरणातच बसले होते…मातीमध्ये. शेवटी खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही आपण सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिरका तिरकाच जातो आणि खेकड्याची एक मानसिकता तुम्हाला माहिती असेल की, ज्या टोपलीत खेकडे असतात त्या टोपलीवर झाकण ठेवण्याची गरज नसते. एखादा खेकडा वर जायला निघाला की बाकीचे खेकडे त्याला खाली खेचत असतात, तसेच हेही खेकडेच आहेत.

दरम्यान, या टीकेला आता शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आम्ही खरं तर अजून धरण फोडलेलंच नाही, केवळ इशारा दिला आहे… ज्या दिवशी आम्ही धरण फोडू त्या दिवशी जो लोंढा येईल त्यात सगळी स्वार्थी, मतलबी मंडळी वाहून जातील! कोविडच्या काळात, लोकांच्या आरोग्याशी खेळ करुन कमावलेला काळा पैसाही बाहेर येईल… खेकडे एकवेळ परवडले, परंतु अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या चिखलात वळवळणारी गांडुळं नकोत…

आज तूमच्या सोबत मूठभर लोक आहेत. उद्या चिमूटभर असतील आणि मग चिमटीतही येणार नाहीत एवढीच शिल्लक असतील… ज्यांची ओंजळ देणारी असते त्यांच्याकडे पसाभर लोक येतात!! पण ज्यांची ओंजळ फक्त घेण्यासाठी पसरली जाते त्यांच्या ओंजळीत एक दिवस एकटेपणा, एकाकीपणा पडतो आणि मग त्याच ओंजळीने चेहरा झाकून रडावे लागते.अशी जहरी टीका म्हात्रे यांनी केली आहे.