”तुम्हांला काय करायचं ते करा…”, सैतान प्रकरणावरुन सदाभाऊ खोत आक्रमक

माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. त्यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) सैतान असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यावर सदाभाऊ आक्रमक झाले असून तुम्हांला काय करायचं ते करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत
अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली आहे. काका आणि पुतण्यांच्या लढाईत विरोधकही प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना सदाभाऊ खोत म्हणाले होते, “शरद पवार सैतान आहेत. पवारांवर नियतीने, काळाने मोठा सूड उगवला आहे. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. गाव गाड्यात हा सैतान पुन्हा येता कामा नये. त्याने नवं सरकार उभं करता कामा नये हे आमचं मुख्य काम आहे. गावगड्याला आता लढाई लढावी लागणार आहे.”

“शरद पवार यांचा जेव्हापासून राजकीय उदय झाला, तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. वाडे विरुद्ध गावगाडे व प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष पवार यांच्या कारकिर्दीत सुरु झाला. शरद पवार यांनी सोबत ठेवलेल्या सरदारांनी गोरगरीब शेतकऱ्यांची खळी लुटली. गावगाडा उद्ध्वस्त केला, तेच सरदार सध्या सैरभैर पळत आहेत. सध्या शरद पवार याच्यावर नियतीने सूड उगवला आहे. त्यामुळे शरद पवार साहेब गावगाड्याकडे धाव घेत ‘मला वाचवा’चा नारा देत आहेत”, असं खोत यांनी म्हटलं आहे.