काळवीट मारुन सलमानने मोठी चूक केलीय, तुम्हाला शब्द देतो… लॉरेन्स बिष्णोईच्या भावाची धमकी 

मुंबई – अलीकडेच सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानचा  सिद्धू मूसवाला करू, असे म्हटले होते. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यातच आता लॉरेन्स बिश्नोईच्या धर्मा भाईने सलमान खान हे आपले पुढचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा लॉरेन्स बिश्नोईच्या धर्मा भाई राजवीर सोपूला सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढील लक्ष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी थेट सलमान खानचे नाव घेतले. राजवीर सोपू म्हणाला, ‘सलमान खानने काळवीट मारले असून आज तो सर्व खटल्यातून निर्दोष सुटला आहे. हरणांना मारून त्यांनी मोठी चूक केली आहे. भविष्यात सलमानचे काम आम्ही करू, असे आम्ही खुलेपणाने सांगत आहोत, यात कसलाही हलगर्जीपणा नाही.

सोपूचं हे उत्तर ऐकून मुलाखतकाराने, ‘तुम्ही माझ्या मुलासारखे आहात म्हणून सांगतोय स्वत:ही जगा आणि इतरांनाही जगू द्या,’ असं म्हटलं. त्यावर सोपूने, “तुम्हाला शब्द देतो, सलमानचा कार्यक्रम करु द्या, त्यानंतर आम्ही कोणालाही काहीही करणार नाही,” असं म्हटलं. सलमानने कधीच या प्रकरणात आपली चूक कबूल केली नाही केवळ मुलाखती दिल्या असा आक्षेपही सोपूने घेतलाय. त्याने केवळ स्वत:ची चूक मान्य केली तरी आम्ही त्याला माफ करु असंही सोपूने मुलाखतीत म्हटलंय.