भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने अखेर दणका दिलाच

मुंबई – भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दणका दिला आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला आहे.

कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालायनेही नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तसंच ही घटना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी खिल्ली उडवण्यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केला.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनावर निकालासाठी उच्च न्यायालयाने आजचा दिवस निश्चित केला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. आता न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांना अटकेपासून संरक्षण असून, तो मागे घेणार की नाही यावर उच्च न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे. यानंतर राणेंच्या अटकेची कारवाई पोलिसांकडून सुरू होईल.