“मुंडे परिवाराचं अस्तित्त्व राजकारणात राहू नये म्हणून हालचाली”, पंकजाताईंच्या वक्तव्यानंतर संजय राऊत खवळले

नवी दिल्ली: राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी (31 मे) दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. जयंतीच्या या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

“मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे.

आता पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत, पण त्यांना भाजप आपलं मानत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केले. त्या मुंडे परिवाराचं अस्तित्त्व राजकारणात राहू नये, यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरु आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे राजकारणात असणाऱ्या मुंडे परिवाराच्या प्रमुख लोकांनी साहसाने निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकारणात हिंमतीने निर्णय घेण्याची गरज असते. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेतले तरच राजकारणात टिकता येते. माझ्यावर अन्याय होतोय, अशा नेहमीच्या रडगाण्याला कोणी विचारत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पंकजा मुंडे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव का व कसा झाला?, हे सांगण्याची आता गरज नाही. भाजप परिवारातच आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरू आहे. काहीही असले तरी आमची मुंडे परिवाराविषयी आस्था कायम राहील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.