शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, उद्धवजी … बाळासाहेबांना खुजे करू नका – शिरसाट 

sambhajinagar  – दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली. शिवसेना आमदारांचा एक गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेले सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर प्रखरपणे उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

दरम्यान, आता या मुलाखतीवर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सुद्धा ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुद्देसूद उत्तर दिले. ते म्हणाले,शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यांचे फोटो, पुतळा तुमच्या स्टेजवर नको असं कुणी म्हटलं तर काय होईल. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, पुण्याईने आम्ही मोठे झालो. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा ठसा उमटवा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ही माणसं खूप मोठी आहेत. शिवसेनाप्रमुखांनी छत्रपतींना नमस्कार केल्याशिवाय भाषणाला सुरूवात केली नाही. शिवसेनाप्रमुखांना छोटे करण्याचा प्रयत्न करू नका असं त्यांनी सांगितले.

आमची चिंता करू नका. तुम्ही राज्यसभेला, विधान परिषदेला MIM ची मते घेताना काही वाटलं नव्हतं का? अडीच वर्ष आपण पहिलं घेऊ असं आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. शरद पवार-उद्धव ठाकरेंचे सख्य होतं हे आम्ही कधी पाहिलं नव्हतं. संजय राऊतांसारख्या माणसाने जुळवाजुळव का केली त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. एकसंघ असायला हवं ही भावना आजही आम्हाला वाटते. परंतु उद्धव ठाकरे आणि आमच्यातील अंतर कसं वाढेल यासाठी प्रयत्न सुरू केले असा आरोपही संजय राऊतांवर  त्यांनी केला.