नवाबांचा जावई होणार क्रिकेटर शुबमन गिल? सारा अली खानसोबतचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे नाते फार जुने आहे. आताचे विराट कोहली-अनुष्का शर्मा ते मंसूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर, अशी बरीचशी क्रिकेटवर आणि बॉलीवूड अभिनेत्रींची नात्यात असल्याची उदाहरणे आहेत. लवकरच या यादीत नवे नाव जोडले जाऊ शकते. होय, भारतीय युवा क्रिकेटर शुबमन गिल (Shubman Gill) आणि बॉलीवूड अभिनेत्री व सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यांचा विमानतळावरील व हॉटेलमधून एकत्र बाहेर निघतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे या दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याच्या चर्चा आहेत.(Sara Ali Khan new Boyfriend)

माध्यमांतील वृत्तांनुसार, २३ वर्षीय शुबमन सारासोबत दिल्लीत एकत्र दिसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, सारा आणि शुबमन दिल्लीतील एका हॉटेलमधून एकत्र बाहेर पडतात. दोघेही साध्या पोशाखात दिसत आहेत. याबरोबरच त्यांना विमानातही एकत्र पाहिले गेले आहे. व्हायरल व्हिडिओत, सारा गुलाबी रंगाच्या टॉप आणि पांढऱ्या पँटमध्ये दिसत आहे. तर शुबमन काळ्या रंगाच्या कपड्यात आहे.

विमानात सारा तिच्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक करतानाही दिसली. चाहत्यांसोबत सेल्फी घेतल्यानंतर ती विमानात शुबमनच्या बाजूला बसते. दोघांनी एकदाच विमानात प्रवेशही केला होता. अशाप्रकारे सारा आणि शुबमनला एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यात नक्की काय चालू आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यापूर्वी हे दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसले होते.