भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शैलेश टिळक यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ब्राह्मण समाज…

Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असताना विरोधकांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.

यातच आता भाजपने देखील एक पाऊल पुढे टाकत आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली असून चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.(Ashwini Laxman Jagtap for Chinchwad and Hemant Rasane for Kasba Peth announced). यावर आता शैलेश टिळक यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

शैलेश टिळक म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आम्ही सांगितले होते की, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. टिळक घरातील सदस्याला उमेदवारी मिळाली पाहिजे होती. अशा परिस्थितीत नैसर्गिकपणे घरच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळते. यामुळे आम्हाला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती. पुणे शहरात आज कुठलाही ब्राह्मण उमेदवार नाही. ब्राह्मणसमाजावर अन्यायाची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.

पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि रासने यांना आमच्या शुभेच्छा आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली आणि यावेळी निवडणुकीबद्दल चर्चा झाली. हा निर्णय दिल्ली वरुन होईल,असे त्यांनी सांगितले होते. ताई गेल्यानंतर फडणवीसांनी आमची भेट फार कमी वेळासाठी घेतली होती, म्हणून काल ते पुन्हा घरी आले होते. विधानसभेचा वर्षभराचा कालावधी आहे, घरच्या सदस्याला दिली असती, तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त होती. पण पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, असे टिळक यांनी स्पष्ट कले.