शरद पवार म्हणजे भीष्म पितामह, UPA कुणाची खासजी जहागीर नाही’, संजय राऊतांनी काँग्रेसला झापलं 

मुंबई –  पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. ‘शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. मी UPA बाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणार’ असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कुणी करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेस पक्षानं UPA साठी प्रयत्न करावेत. UPA कुणाची खासगी जहागीर नाही. भाजप विरोधात ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. केजरीवाल प्रयत्न करत आहेत. शरद पवार एक भीष्म पितामह आहेत. काँग्रेसकडून मात्र कुठलीही जबाबदारी दिसत नाही’, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.