बच्चू कडू कोण बाबा? कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबत…; शरद पवारांची खोचक टीका

मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते असण्याबाबत व पक्षात फूट आहे की नाही यावर झालेल्या वक्तव्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu, MLA of Prahar Sangathan) यांनी भाष्य केले होते. आता यावर शरद पवारांनी (Sharad pawar) कडू यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे चित्र आहे.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार बच्चू कडूंनी खोचक टिप्पणी केली होती. “शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढंच मी सांगेन”, असं बच्चू कडू म्हणाले होते. “हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत”, असा टोलाही त्यांनी लगावाल होता.

दरम्यान, आज कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना बच्चू कडूंच्या या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी यावरून बच्चू कडूंना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. “बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे तुम्ही उद्या तर आणखीन कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मला मागाल”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, पत्रकारांनी बच्चू कडू चार वेळा आमदार असल्याची आठवण करून देताच शरद पवारांनी “ते चार वेळा आमदार आहेत. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो”, असं म्हणत मिश्किल टिप्पणी केली.