मराठवाड्यात शिंदे गट सुसाट; सत्तार, शिरसाट,भुमरे यांच्या पॅनलने गड राखले

संभाजीनगर – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde), भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. दरम्यान, या लढाईत भाजप (BJP) आणि शिंदे गटाची सरशी होताना पाहायला मिळत आहे.

संभाजीनगरमध्ये  सर्वात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांचे वर्चस्व कायम राहिल्याचे चित्र सुरुवातीला दिसत आहे. शिंदे गटाच्या पॅनलमधील पाच उमेदवार येथे विजयी झाल्याचे चित्र आहे.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मतदार संघातही शिंदे गटाने झेंडा फडकवल्याचे चित्र आहे. तीन पैकी 2 ग्रामपंचायतवर शिंदे गट विजयी झाला आहे. नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत. पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा फडकला. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाल्याचे दिसून येत आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या.