राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना पक्ष संपविण्याचा घाट घातला आहे; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल

गुवाहाटी : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

दरम्यान, कोरेगाव जिल्हा सातारा येथील शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी आता आक्रमक भुमिका घेण्याचे कारण सांगीतले आहे.ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना पक्ष संपविण्याचा घाट घातला आहे. आम्ही पराभव केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला जात होता, हेच माजी आमदार भविष्यात आमदार होणार अशा गर्जना राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून केल्या जात होत्या.

राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आम्ही सर्व आमदारांनी वारंवार मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार केली; पण काहीच उपयोग झाला नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना वाचविण्यासाठीच आम्ही सर्व आमदारांनी एकनाथजी शिंदे यांस ही रोखठोक भुमिका घेण्याची आग्रही मागणी केली. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आघाडी नको; तरं नैसर्गिक पक्षासोबत युती हवी हा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या अंतर्मनातील आवाज आहे असं शिंदे यांनी म्हटले आहे.