लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा, दोन अल्पवयीन मुलींचं शोषण केल्याचा आरोप

नवी दिली – कर्नाटकातील चित्रदुर्गाचा मुरुगा मठ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुगा (Shivamurthy Muruga) यांच्यावर लैंगिक छळाचे (Sexual Harassment) आरोप आहेत. आता याप्रकरणी त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवमूर्ती मुरुगा याला सोमवारी अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. शिवमूर्ती हे चित्रदुर्गातील या प्रसिद्ध मुरुगा मठाचे विशेष पुजारी आहेत. मठात त्यांचा विशेष मान आहे. मात्र, त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर मठ वादात सापडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवमूर्तीला हावेरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्याच्यावर मठ संचलित संस्थेत अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. संस्थेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केल्यावर लैंगिक छळाची बाब समोर आली. यानंतर म्हैसूर पोलिसांनी (Mysore Police) शिवमूर्ती मुरुगाविरोधात एफआयआर नोंदवला. मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलमांतर्गत मुरुगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मठ संचलित या शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी म्हैसूरमधील ‘ओदनदी सेवा संस्थान’ या स्वयंसेवी संस्थेशी (एनजीओ) संपर्क साधला होता. यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. संस्थेचे प्रमुख स्टेनली यांनी सांगितले की, लैंगिक छळ ही केवळ या दोन विद्यार्थिनींची समस्या नाही. या संस्थेत शिकणाऱ्या आणखी अनेक विद्यार्थिनींचा अशाच प्रकारे छळ होत आहे. आत्ताच नाही तर गेली अनेक वर्षे हे चालू आहे. मात्र, भीतीपोटी विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची बाब उघड केली नसल्याची बाब आमच्या निदर्शनास आणून दिली. आम्ही कोणाच्याही दबावाला किंवा धमकीला घाबरणार नाही आणि कोणाच्याही पुढे झुकणार नाही. मुलांच्या हक्कांचे रक्षण करणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असं ते म्हणाले.