देशातील ‘ही’ दोन शहरं पवित्र क्षेत्र म्हणून घोषित; मांस आणि दारूच्या विक्रीवर पूर्णपणे असणार बंदी

भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन शहरांना ‘पवित्र क्षेत्र’ म्हणून घोषित केले असून मांस आणि दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून २८५ किमी अंतरावर असलेल्या दमोह जिल्ह्यात असलेल्या कुंडलपूरमध्ये जैन समाजाच्या पंचकल्याणक उत्सवात सहभागी होताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रेरणेने मी कुंडलपूर आणि बांदकपूरलाला पवित्र क्षेत्र म्हणून घोषित करत आहे, जिथे मांस आणि दारूवर पूर्ण बंदी असेल.’ बांदकपूरशहर हे शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, विद्यासागर महाराज यांच्या इच्छेनुसार राज्य सरकार वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम एका वर्षात हिंदीमध्ये सुरू करणार आहे.

पुढे बोलताना नागरिकांनी गायींच्या रक्षणाच्या कामात पुढे यावे आणि चांगल्या पर्यावरणासाठी झाडे लावावीत, असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग म्हणाले होते की सरकार पुढील शैक्षणिक सत्रापासून भोपाळमधील गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू करेल.