‘या’ देशामध्ये ओमिक्रॉनचा कहर; आतापर्यंत 37 हजार 101 नागरिकांना झाला संसर्ग

नवी दिल्ली- ब्रिटनमध्ये काल एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 12133 नवीन ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली. आतापर्यंत 37 हजार 101 ब्रिटनवासियांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे; अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेनं दिली आहे.

गेल्या 24 तासांत ब्रिटनमध्ये 82 हजार 886 कोरोनाबाधितांची नोंद झाली. ब्रिटनमधले 1 कोटी 13 लाखांपेक्षा जास्त नागरिक आतापर्यंत कोरोना बाधित झाले असून गेल्या 24 तासांत 45 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या आजाराने या देशातील 1 लाख 47 हजार 218 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 611 कोरोनाबाधितांवर सध्या ब्रिटनमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान, ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीनं ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना जर्मनीत येण्यासाठी बंदी केली आहे. लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या, पण सध्या ब्रिटनमध्ये असलेल्या, जर्मन नागरिकांनी जर्मनीमध्ये परत येण्यापुर्वी आपल्या कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणि दोन आठवड्याचं सक्तीचं विलगीकरणात राहणं अनिवार्य करण्यात आले आहे. हे कडक निर्बंध आज संध्याकाळपासून लागू होतील, असं जर्मनीच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे.

डेन्मार्क, फ्रांस, नॉर्वे आणि लेबनन या देशांनाही जोखीम अससेल्या देशांच्या यादीत टाकलं आहे. या देशांसाठीही जर्मनीत नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर भारतातही कोरोना नियमांचं गांभिर्यानं आणि काटेकोर पालन करावं आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्यानं करून घ्यावं असं आवाहन केंद्र आणि राज्य शासना बरोबरच सर्वच जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनही सातत्यानं करत आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोविड-19 चा वाढत्या संसर्गाचं प्रमाण लक्षात घेता भारतानं आगामी काळांत कुठल्याही आरोग्यविषयक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे असा इशारा भारतीय आर्युविज्ञान संस्था अर्थात एम्सचे संचालक डॉ.रणदिप गुलेरीया यांनी दिला आहे. देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 8 हजार 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 98.39 शतांश टक्के झाला आहे. काल या आजाराने देशात 132 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.