अबब! ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक भारत पाक सामन्यांची झाली ‘इतकी’ तिकीट विक्री

मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना स्टेडियमवर पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषकातील भारत पाक सामना २३ आँक्टोबर २०२२ रोजी जगातील सर्वात मोठ्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर नियोजित केला आहे. यासाठी आँनलाईन तिकीट विक्री देखील सुरू झाली आहे. त्यामुळे अवघ्या काही वेळातच भारत पाक सामन्यांची तब्बल ६०,००० तिकीट विक्री झाली आहे.

भारत पाक सामना बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींची पंसती सर्वात जास्त असते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी २,००,००० तिकीट विक्री झाली आहे. भारत पाक यांच्या नंतर न्युझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्रुपमधील देखील सामन्यांची तिकीट विक्री जोरात झाली आहे. त्यामुळे यावर्षी विश्वचषकमधील सामने बघण्यासाठी मोठी रंगत येणार आहे.

जगातील सर्वात मोठा मैदान म्हणून मेलबर्न मैदानाची ओळख आहे. याठिकाणी तब्बल १ लाख प्रेक्षक एकाचवेळी क्रिकेटचा सामना बघू शकतील, इतकी मोठी जागा उपलब्ध आहे. याच मैदानावर भारत पाक सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात येत्या १६ आँक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे.

युएईमध्ये मागील वर्षी पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाला धूळ चारल्यानंतर न्युझीलंड संघाकडूनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे भारताचं आव्हान साखळी गटातच संपुष्टात आलं होतं. यावर्षी भारतीय संघ पाकचा बदला घेण्याच्या तयारीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वविजेता बनणार की नाही, हे आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.