वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला करावे लागणार ‘हे’ काम, गांगुलीचा द्रविड अन् रोहितला तगडा सल्ला

सर्व क्रिकेट संघांनी २०२३ च्या वनडे विश्वचषकाची (ODI World Cup 2023) तयारी सुरू केली आहे. वनडे विश्वचषक २०२३ भारतातच होणार आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. भारताने आतापर्यंत १९८३ आणि २०११ असे दोनदा विश्वचषक जिंकला आहे. आता माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारतीय संघाला तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी कामाचा सल्ला दिला आहे. काय म्हणाला सौरभ गांगुली?

सौरव गांगुली (Sourav Ganguly Advice) म्हणाला की, “भारत कधीच कमकुवत संघ असू शकत नाही. ज्या देशात इतकी प्रतिभा आहे, त्या देशाचा संघ कधीच कमकुवत होऊ शकत नाही. अफाट प्रतिभा असूनही निम्म्या खेळाडूंना संधीही मिळत नाही. विश्वचषकापर्यंत संघ प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि निवडकर्त्यांनी एकाच संघावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे.”

माजी कर्णधार गांगुली पुढे म्हणाला की, “भारतीय संघाने विश्वचषकात कोणत्याही दडपणाशिवाय खेळले पाहिजे. त्यांनी ट्रॉफी जिंकली किंवा नाही याने काही फरक पडत नाही. ज्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू आहेत. तो संघ कमकुवत असू शकत नाही.”

गेल्या १० वर्षांपासून चषकाचा दुष्काळ
भारतीय संघाने गेल्या १० वर्षांपासून आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये भारताने अखेरची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचवेळी २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.