सत्यजित तांबे यांना अखेर भाजपाचा पाठिंबा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली घोषणा

नाशिक – दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडी चांगलाच जोर लावताना दिसत आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबाबत मोठी बातमी पुढे येत आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपाचे (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते आज (२९ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा पक्षाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.

“आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.