मुंबई – महाविकास आघाडी सरकारला आज दोन पूर्ण झाली असताना राज्याला सर्वांगीण प्रगतीकडे नेण्याचे सोडून केवळ टक्केवारी, वसुली, खंडणी व सुडाचे राजकारण करण्यात महाविकास आघाडी सरकार मग्न असल्यामुळे इंडिया टुडेच्या आकडेवारीत महाराष्ट्र तब्बल नवन्या स्थानी घसरला असून महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अधोगतीकडे नेत ठाकरे सरकारची राज्यातील जनतेला ‘द्विवर्षपूर्ती भेट’ देण्यात आल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
इंडिया टुडे या नियतकालिकाने घोषित केलेल्या आकडेवारीत स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र ६ व्या क्रमांकावरून १० व्या क्रमांकावर घसरला आहे. अभ्यासाच्या नावाखाली विनानिमंत्रण परदेश पर्यटन करण्यात मग्न असल्यामुळे ‘युवराज’ मंत्री असलेल्या पर्यटनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्रीच लुटेरे व वासुलीखोर असल्यामुळे आणि राज्यातील मंत्रीच बलात्कारी बनल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र अकराव्या स्थानी घसरला असून कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला मृत्युशय्येवर ठेवणाऱ्या आणि केवळ चमकोगिरी व खोटे बोलून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असलेल्या आरोग्य मंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्र आरोग्य सुविधांच्या यादीत चौथ्या स्थानावरून तब्बल तेराव्या स्थानावर घसरला आहे.
केवळ स्वत:च्या पक्षाचा व नातेवाईकांचा आर्थिक विकास करण्यात राज्याचे अर्थमंत्री व्यस्त असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सातव्या स्थानी असलेला महाराष्ट्र आर्थिक प्रगतीच्या बाबतीत तब्बल पंधराव्या स्थानी घसरला आहे. त्यामुळे विचारांच्या आघाडीवर व सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलेले हे ठाकरे सरकार महाराष्ट्राला सर्वागीण विकासाच्या बाबतीत सुद्धा अपयशाच्या खायीत घेऊन चालले आहे, अशी टीका सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.
एक पूर्णपणे विश्वासघातकी, भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम सरकार म्हणजे हे महाविकास सरकार आहे अशी महाराष्ट्राच्या इतिहासात या सरकारची नोंद झाली असून आता राज्यातील १२ कोटी जनताच यांच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा आ. भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
https://youtu.be/FkhUTw1OjTM