दगडू पालवीची गोष्ट झकास ! पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास !

मुंबई – ‘टाइमपास’ ( Time pass ) म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची ( Dagdu and Praju ) जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा ( love story )  दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाच्या टिझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाबद्दलची हीच उत्सुकता आणि उत्कंठा आता ट्रेलरमधून अधिकच वाढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव ( Ravi Jadhav ), झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, निर्मात्या मेघना जाधव ( Meghna Jadhav ) यांसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

टाइमपासच्या दोन्ही भागात प्रेक्षकांना दगडू आणि प्राजूची प्रेमकथा बघायला मिळाली होती. याही भागात प्रेमकथा असणार आहेच पण यावेळी दगडूसोबत असणार आहे पालवी. आणि ही पालवी साकारली आहे सध्याच्या तरुणाईच्या ‘दिल की धडकन’ अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे ( Hrita Durgule ) हिने. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. तिचा हाच डॅशिंग अवतार टिझर मधून प्रेक्षकांनी बघितला होताच आता ट्रेलरमधून डॅशिंग सोबत तिची ‘लव्हेबल’ अदाही बघायला मिळणार आहे. चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे. चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून त्यांच्यासोबतीने प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत.

‘टाइमपास ३’ बद्दल बोलतांना रवी जाधव म्हणाले की, टाइमपासच्या पहिल्या भागात शेवटी दगडू म्हणतो की ‘आपण शिक्षणाचा ब्रिज घेऊन प्राजूपर्यंत पोहचणार’ दुसऱ्या भागाची सुरुवात एक यशस्वी उद्योजक बनलेल्या दगडूच्या गोष्टीपासून झाली होती. या दोन्हीच्या मधला नेमका दगडूचा प्रवास कसा होता ? शिक्षणाचा ब्रिज घेताना त्या वाटेत त्याला नेमकं कोण कोण भेटलं ? कोणतं वळण आलं ? हे सांगायचं राहून गेलं होतं. तेच सर्व तेवढ्याच धमाल पद्धतीने सांगण्यासाठी आम्ही ‘टाइमपास ३’ चा घाट घातला. माझ्या मते एखाद्या चित्रपटाचा पूर्वार्ध (प्रिक्वेल) आणि उत्तरार्ध (सिक्वेल) प्रदर्शित झाल्यानंतर अशी मधली गोष्ट सांगणारा भाग आणणे हा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होत असेल. पहिल्या दोन भागांप्रमाणे हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे.

तर झी स्टुडिओजचे व्यवाय प्रमुख मंगेश कुलकर्णी ( Mangesh Kulkarni ) म्हणाले की, टाइमपास’ या चित्रपटाचं, यातील व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांच्या मनात एक विशेष असं स्थान आहे. ही बाब लक्षात घेऊनच रवी जाधव यांनी ‘टाइमपास ३’ ची संकल्पना आमच्यासमोर मांडली आणि आम्हालाही ती आवडली. दगडू आणि पालवीच्या मैत्रीतील प्रेमाची किंवा प्रेमळ मैत्रीची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आम्हाला आहे. ‘टाइमपास ३’ ( Timepass 3 ) चा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून येत्या २९ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.