मतमोजणीच्या ठिकाणी न जाता सुधीर तांबे मानसच्या अंत्यविधीला हजर

नाशिक : नाशिकच्या पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (32) यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मानस पगार (Manas Pagar) हे सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच युवक काँग्रेसमधील चर्चेतील चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मानस पगार हे सहकाऱ्यासमवेत पिंपळगावकडे परतत होते. मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे निधन झाले. तर सहकारी सूरज मोरे हा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान मानस पगार हे तांबे कुटुंबियांच्या जवळचे असल्याने तांबे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.  यामुळे सत्यजीत तांबे यांचे वडील मतमोजणीच्या ठिकाणी न जाता ते अत्यसंस्कार करण्यासाठी हजर झाले आहेत. न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.