हे स्वप्न तर नाही ना? भारताचा उपकर्णधार बनल्यानंतर सूर्यकुमारचा आनंद गगनात मावेना; वाचा त्याची प्रतिक्रिया

मुंबई- ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेच्या भारत दौऱ्यात (Sri Lanka Tour Of India) ३ सामन्यांची टी२० (T20I Series) आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. यातील टी२० मालिकेसाठी भारताच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा झाली असून हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपद तर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. सूर्यकुमारसाठी (Suryakumar Yadav) ही खूप मोठी बाब असून पहिल्यांदाच तो आंतरराष्ट्रीय पातळीवर संघाच्या नेतृत्त्व विभागाचा भाग असेल. आपल्याला मिळालेल्या या जबाबदारीला सूर्यकुमारने आपल्या मेहनतीचे फळ असे संबोधले आहे.

३ ते ७ जानेवारीदरम्यान अनुक्रमे मुंबई, पुणे आणि राजकोट येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात ३ टी२० सामने खेळले जाणार आहेत. या मालिकांसाठी भारताच्या उपकर्णधारपदाची (Team India Vice-Captain) जबाबदारी मिळाल्यानंतर बुधवारी (दि. २८ डिसेंबर रोजी) सूर्यकुमारने वृत्तसंस्था पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपला आनंद व्यक्त केला.

मुंबईकर सूर्यकुमार म्हणाला की, “माझे वडील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी मला ही बातमी दिली. त्यांनी मला संघाची यादी पाठवली आणि छोटासा संदेशही दिला. अजिबात कोणत्याही प्रकारचा दबाव घेऊ नकोस आणि नेहमीप्रमाणे तुझ्या फलंदाजीचा आनंद घे, असं त्यांनी मला म्हटलं.”

३२ वर्षीय सूर्यकुमारने पुढे म्हटले की, उपकर्णधारपदाची बातमी ऐकल्यानंतर काही क्षणांसाठी मी माझे डोळे बंद केले आणि स्वत:लाच विचारले की हे स्वप्न तर नाही ना? ही खरच खूप भारी फिलिंग आहे. मला याची अजिबात अपेक्षा नव्हती. मी फक्त इतकेच म्हणेन की, मी यावर्षी ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, त्याचे हे बक्षीस आहे. मला खूप खूप छान वाटत आहे. मी ही जबाबदारी स्विकारण्यासाठी उत्सुक असल्याचेही सूर्यकुमारने म्हटले.