शिवसैनिक उद्यापासून रामदास कदम यांना राज्यात फिरू देणार नाहीत – सुषमा अंधारे

मुंबई – खासदार संजय राऊत, विनायक राऊत, दिपाली सय्यद (Sanjay Raut, Vinayak Raut, Dipali Syed) यांच्यासह ठाकरे गटातील नेते विरोधकांवर अनेकदा पातळी सोडून टीका करताना दिसून येत होते, मात्र आता शिंदे गट आणि इतर विरोधक सुद्धा जशास तसे उत्तर देत असल्याचे चित्र आहे. यातच ज्यांनी शिवसेनेसाठी रक्ताचे पाणी केले असे माजी मंत्री रामदास कदम यांनी देखील आक्रमकपणे टीका करायला सुरुवात केली आहे. यातूनच काहीप्रमाणात आक्षेपार्ह टीका कदम यांच्याकडून झाल्याचा आरोप होत आहे.

कदम यांनी केलेली टीका ठाकरे गटाला झोंबली असून आता रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) विरोधात शिवसेनेकडून राज्यभरात आंदोलन (Protest) सुरु होत आहेत, अशी माहिती शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली. कदम यांच्या वक्तव्यावरून दुखावलेले शिवसैनिक उद्यापासून रामदास कदम यांना राज्यात फिरू देणार नाहीत, असा धमकीवजा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

ज्या मराठवाड्यात तुम्ही शिवसेना संपर्कप्रमुख होतात, त्याच मराठवाड्यातील लातूर आणि बीडमध्ये, तुम्ही खरंच येऊन दाखवा, असं वक्तव्य त्यांनी केलंय… शिवसेना नेत्यांनी तुमच्यावर टीका केली असेल पण तुमच्या कुटुंबावर कुणी घसरलं नाही. तरीही तुम्ही वैयक्तिक पातळीवर घसरता? सरड्यापेक्षा जास्त वेगानं तुम्ही रंग बदलतायत, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं..

ज्यांच्या मांडीवर जाऊन बसताय.. तीच लोकं तुमचा पगार किती… तुमची निष्ठा किती असा सवाल करत होते, पण त्याकडेही तुम्ही लक्ष देत नाहीयेत, असं वक्तव्य करत सुषमा अंधारे यांनी भाजपसहित (BJP) रामदास कदमांवर हल्लाबोल केला.