‘नागपुरातील उड्डाणपूल, रेल्वे, एअरपोर्ट पाहिले, पण भाजपचे लोक भीक मागतांना दिसले नाहीत’

नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे.

काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईनंतर आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा कलगीतुरा रंगला आहे. यातच आता वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जात आहे, आपण नागपुरातील उड्डाणपूल, रेल्वे पूल मेट्रोचे पूल, रेल्वे, एअरपोर्ट पाहिले. पण भाजपचे लोक भीक मागतांना दिसले नाहीत. भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही का ? या देशातले बिल्डर, उद्योगपती, हवालावाले यांच्या पैशावर भाजप पक्ष जिवंत आहे आणि सरकार चालत आहे, केंद्रीय तपास यंत्रणा हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागेल.

महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे किरीट सोमय्या हे देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत का, ज्या पद्धतीने सिरीयल किलर असतात रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच सोमय्या हे सीरियल कम्प्लेंनन्ट झालेले आहेत. अशी टीका राऊत यांनी केली आहे.