कायदा माझ्या बापाने लिहिलाय,त्यामुळे… गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

Thane – शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut), भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) आणि सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. तर, विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामी करणारे भाषण केले होते.

या प्रक्षोभक भाषण प्रकरणी सुषमा अंधारे,आमदार भास्कर जाधव,खासदार विनायक राऊत,धर्मराज्य पक्षचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, महिला आघाडी अध्यक्ष अनिता बिर्जे, निवेदक सचीन चव्हाण यांच्यासह सात नेत्यांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कलम 153,500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत दोन गटात हाणामारी करण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, कलम 500 ,504 अंतर्गत बदनामी केल्याचा गुन्हा या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यानंतर आता अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला अजिबात आश्चर्य वगैरे काहीच वाटलं नाही. मी या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली प्रीपेड होतेच. हे सगळं अपेक्षित आहे. मला नोटीस आली तर नक्की जाईन असंही अंधारे म्हणाल्या.

जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना अशा प्रकारेच दंड शाही दाखवली जाईल. 153 अ नुसार हा गुन्हा दाखल झाला असून, माझ्याकडे अजूनही रीतसर प्रत आली नाही. मी जे केलं ते नक्कल नाही. मोदीजींनी जे सांगितलं तेच मी माझ्या भाषणात बोलले. राज ठाकरे माझ्यापेक्षा जास्त अशा नकला करतात असं म्हणत अंधारे यांनी भाषणाबाबत खुलासा केला आहे.