Rajesh Kshirsagar – अमृत २.० अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रु.१५२ कोटींचा निधी मंजूर

Rajesh Kshirsagar : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी सह रंकाळा व शहरातील इतर प्रमुख तलावांच्या पाण्यावर होवून प्रदुषणात वाढ होत आहे. याबाबत केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून शहरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिस्सारण प्रकल्प व रंकाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प व्यवस्था करण्यासाठी एकूण रु.१५२ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आवश्यक प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे २१५ कि.मी. पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात १०१ एम.एल.डी क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी आवश्यक एकूण रु.३५४ कोटी इतक्या रक्कमेचे स्वतंत्र तीन प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. त्यातील मलनिस्सारण प्रकल्पाच्या तीन कामांसाठी रु.५७.३२ कोटी, रु.५१.१३ कोटी आणि रु.३१.९६ कोटी तर रंकाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास रु.११.९९ कोटींचा असा एकत्रित रु.१५२.४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये मलनिस्सारण प्रकल्पाअंतर्गत संकलन आणि वाहतूक व्यवस्था, पूर्ण गुरुत्वाकर्षण गटार करणे,  सांडपाणी पंपिंग स्टेशन उभारणे,  पंपिंग मशिनरी, राईजिंग मेन नेटवर्क, सर्वेक्षण कार्य, जनरेटर प्लॅटफॉर्म उभारणे, विश्वकर्मा ओल्या विहिरीला चेंबर जोडणे, एसएससी येथे विश्वकर्मा ओल्या विहिरीपासून एसटीपीपर्यंत वाढणारे पाणी प्रवाहित करणे, दसरा चौकातील एसएससी बोर्ड एसटीपी ते जयंती नाला येथे प्रक्रिया केलेले पाणी निर्गत करणे यासह इतर कामांचा समावेश आहे.
तर रंकाळा पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेसाठी रंकाळा तलाव येथील पदपथ उद्यानात रिटेनिंग वॉल (काँक्रीट वॉल) बांधणे, पदपथ उद्यान येथे पदपथाचे बांधकाम (लांबी २३४ मीटर) करणे, तलावाच्या नेव्ही इकोलॉजीचे पुनरुत्थान, पुनर्संचयित आणि पुनरुत्थान COWNOMICS (पेटंट तंत्रज्ञान) द्वारे करणे आदी कामांचा समावेश आहे. अमृत २.० अभियानाअंतर्गत मंजूर निधीत केंद्र शासन ३३.३३%, राज्य शासन ३६.६७% आणि महानगरपालिका ३०% हिस्सा राहणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून, अमृत २.० योजनेतून मलनिस्सारण प्रकल्पासह रंकाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पास निधी मंजूर केल्याबद्दल कोल्हापूरवासीयांच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचेही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सांगितले.