लवकरच किरीट सोमय्यांचा ‘टॉयलेट घोटाळा’ बाहेर काढणार, संजय राऊतांचा इशारा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे माजी खासदार किरीट सोमय्या बाहेर काढत असून आता सोमय्या यांच्यावरच घोटाळा केल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांचे घोटाळे बाहेर काढले जात असताना आता आणखी एक घोटाळा आज बाहेर येणार आहे.

महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर देणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.मात्र, किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सोमय्या याना इशारा दिलाय.

ज्यांनी घोटाळे केले आहेत. त्यांनी घोटाळ्यावर काही बोलू नये. दाऊद इब्राहिम याने देशप्रेमावर काही बोलले तर ते लोंकाना पचणार नाही. तसेच, तुम्हीच घोटाळ्यावर बोलणार असाल तर ते लोकांना पचणार नाही असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्ही जे घोटाळे केले त्याचे उत्तर द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही काय घोटाळा केला तो आता बाहेर काढणार आहे. हे प्रतिष्ठान सोमय्या यांची पत्नी श्रीमती सोमैया आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आहे. पर्यावरणाच्या नावाखाली या प्रतिष्ठानने आणि सोमय्या याने १०० कोटींचा घोटाळा केला आहे.

आयएनएस विक्रांतचे पैसे हडप केले. तो पैसा जिरविण्यासाठी मीरा-भाईंदर येथे १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केला का? असा सवाल राऊत यांनी केला. सोमय्या याचा हा ‘टॉयलेट घोटाळा’ लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.