महाराष्ट्र सरकार असे अनेक उपक्रम राबवत आहे ज्याद्वारे आर्थिक-सामाजिक संबंध दृढ होतील – गोऱ्हे

पुणे – सामाजिक आणि आर्थिक बदलांना सामोरे जाताना पर्यावरण बदलाची जाणीव ठेवत शाश्वत विकासाच्या दिशेने प्रयत्न करणे आणि अशा प्रयत्नात सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

हॉटेल रमाडा प्लाझा येथे ग्लोबल इंडिया बिझिनेस फोरमतर्फे आयोजित ‘बिझिनेस एक्सलन्स अवॉर्ड अँड इंटरनॅशनल सेमिनार २०२१’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मोरोक्कोचे राजदूत मोहम्मद मलिकी, कॉस्टरीकाचे राजदूत क्लॉडीओ अनसोरेना, अझरबैजानचे राजदूत मोहम्मद मालिकी, नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र सरकार असे अनेक उपक्रम राबवत आहे ज्याद्वारे आर्थिक-सामाजिक संबंध दृढ होतील. आपल्याला सामाजिक व आर्थिक बदलाला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी पर्यावरण बदलासारख्या विषयाची योग्य जाण आणि माहिती असणे आवश्यकत आहे. प्रत्येक देशाकडे त्याविषयी नियोजन असणे गरजेचे आहे. २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करायचे आहे. यासाठी सर्वाना मिळून प्रयत्न करावे लागतील.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.