विनीत वर्तक – १९५९ चं वर्षं होतं. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये आजही चाळसंस्कृती शाबूत होती. घराला घरपण देणारी माणसं शेजारी पाजारी असायची. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण कधी खिडकीमधून तर कधी दरवाजातून तर कधी गच्चीवर भेटून होत असे. अश्या एका संध्याकाळी मुंबईच्या गिरगाव भागात एकेमकांच्या शेजारी राहणाऱ्या सात बायका बिल्डिंगच्या गच्चीवर भेटल्या होत्या. बघायला गेलं तर भेटीला काही निमित्त नव्हतं पण विचार केला तर त्या भेटीत खूप काही दडलं होतं. कदाचित त्यांनाही माहित नव्हतं की ही भेट भारताच्या सहकार क्षेत्राला आणि हजारो भारतीय स्त्रियांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे. याच भेटीत सहकार क्षेत्रातील एका उद्योगाचा श्रीगणेशा झाला. तो उद्योग म्हणजेच ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’. ज्या उद्योगानं भारताच्या स्त्रियांचं आयुष्य तर बदलून टाकलंच पण आजही जगात अभ्यासाचा विषय असलेल्या या उद्योगाने आपले पंख जगातील २५ पेक्षा जास्ती देशांत पसरले आहेत. भारतीय दुर्गाशक्तीचं प्रतीक असणाऱ्या या उद्योगाची सुरूवात केली होती ‘लिज्जत सिस्टर्स’नी. त्यातील एक होत्या ‘जसवंतीबेन जमनादास पोपट’.
भारतीय संस्कृतीत आहाराला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं आहे, त्यामुळे भारतीयांच्या आहारातील प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं स्थान आहे. चपाती, भाजी, भात, आमटी, डाळ ते अगदी कोशिंबीर आणि लोणच्यापर्यंत प्रत्येक पदार्थाची विविध रूपं आणि ते बनवण्याच्या पद्धती आज गेली कित्येक पिढ्या परंपरेने चालत आलेल्या आहेत. त्यातील एक घटक म्हणजेच ‘पापड’. काळाच्या ओघात पापड घरी बनवणं शक्य नसल्याने ते बाजारातून खरेदी केले जातात. बाजारात पापड म्हटलं की एकच नाव समोर येतं ते म्हणजे ‘लिज्जत’. लिज्जत ज्याचा अर्थ होतो ‘चवदार’, हे नाव आता पापडापुरतं मर्यादित नाही तर तो आता एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. फक्त ८० रुपये भांडवल टाकून गिरगावातल्या एका गच्चीवर ७ भारतीय महिलांच्या भागीदारीने सुरू झालेला उद्योग आता तब्बल १६०० कोटी रुपयांपेक्षा जास्ती वार्षिक उलाढाल करतो. आज भारतातील १७ राज्यांच्या ८५ शाखांमधून तब्बल ४५,००० भारतीय स्त्रिया आज लिज्जतमुळे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, ज्या जवळपास ४८० कोटी पापडांची निर्मिती करतात जे भारतासोबत जगातील २५ पेक्षा जास्त देशांत चवीने खाल्ले जातात.
‘जसवंतीबेन जमनादास पोपट’ या ‘लिज्जत’च्या त्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या प्रवासाच्या साक्षी आहेत. संपूर्ण लिज्जत ब्रँड आपल्या मालकीचा करण्याची संधी असतानासुद्धा वयाच्या ९१ व्या वर्षीसुद्धा आपल्या तत्त्वाला त्यांनी जपलं आहे. याच तत्त्वामुळे ‘लिज्जत’ आज आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे ज्यावर करोडो लोकं डोळे बंद करून विश्वास ठेवतात. व्यवहार हा खरा, सच्चा आणि सचोटीने केला पाहिजे आणि दर्जा आणि गुणवत्ता यावर कधीच तडजोड न करता ग्राहकांचं समाधान हीच आपली पावती हे तत्त्व अंगीकारत ८० रुपयांपासून सुरू झालेला व्यवहार आज १६०० कोटींचा झाल्यावरही आपली तत्त्वं राखून आहे. यामागे आहे त्या दुर्गाशक्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती, खरेपणा आणि प्रचंड मेहनत घेऊन आपल्यासोबत प्रत्येक भारतीय स्त्रीला आत्मनिर्भर बनवत तिला तिच्या पायावर उभी करण्याची तळमळ.
श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड ही भारतीय स्त्रियांची सगळ्यांत जुनी आणि सगळ्यांत पहिली सहकार व्यवस्था आहे जिचा अभ्यास आज मॅनेजमेंट मध्ये केला जातो. कश्या पद्धतीने पापडाचा दर्जा, त्याचं वितरण, त्याची व्यवस्था, नफा-तोटा, अंदाजपत्रक आणि ताळेबंद कोणीही मालक नसताना कसा काय फक्त विश्वासाने वर्षानुवर्षे व्यवस्थित पूर्ण केला जातो, वन रूम मध्ये राहणाऱ्या, सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या आणि अगदी तुटपुंजं शिक्षण असलेल्या भारतीय महिलांनी कश्या पद्धतीने सहकार क्षेत्रात क्रांती घडवून आणली, याचा अभ्यास केला जातो. जसवंतीबेन जमनादास पोपट यांनी शिक्षण नसतानाही व्यवहाराची काही साधी तत्त्वं जपली त्यामुळेच आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. तो झाल्यावरही नफाखोरी करून फक्त स्वतःचा फायदा त्यांनी केला नाही तर भारतातील जास्तीत जास्त स्त्रियांना यात सहभागी करून घेतलं.
‘जसवंतीबेन जमनादास पोपट’ यांच्या सहकार क्षेत्रातल्या उत्तुंग कार्यासाठी भारत सरकारने त्यांचा २०२१ साली पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. एक भारतीय स्त्री ठरवलं तर आपल्या शिलकीतून घराला हातभार लावण्यासाठी सहकार क्षेत्रातील एक उत्तुंग उद्योग उभारून आपल्या सोबत हजारो भारतीय स्त्रियांचं आयुष्य सुखकर करू शकते. आपल्या तत्त्वांना वयाच्या ९१ व्या वर्षी पाळत आणि ती आपल्या पुढल्या पिढीकडे सुपूर्द करत सहकार क्षेत्रात मापदंड ठरलेल्या दुर्गाशक्ती जसवंतीबेन जमनादास पोपट यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्याच्या पुढल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
जय हिंद !!!
https://youtu.be/FkhUTw1OjTM