नाताळच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी आणि गर्दी होणाऱ्या समारंभांवर निर्बंध लावण्याचा केंद्राचा राज्यांना सल्ला

नवी दिल्ली- ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असल्यानं कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, असा सल्ला केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आढावा घेतला.

संसर्गवाढ रोखणे, चाचण्या, रुग्णालयातील व्यवस्थापन, कोरोना सुरक्षित व्यवहार आणि लसीकरण या पाच मुद्द्यांवर राजेश भूषण यांनी यावेळी भर दिला. नाताळच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी आणि गर्दी होणाऱ्या समारंभांवर निर्बंध लावण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे. तसंच, एकाच ठिकाणी अधिक रुग्ण आढळल्यास प्रतिबंधित क्षेत्रही तातडीनं जाहीर करावं, असं सुचवण्यात आलं आहे.

विमान वाहतूक

कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिल्लीत उतरणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, दिल्लीतल्या विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांच्या शरीराचं तापमान तपासलं जाणार आहे. तसंच चाचणीसाठी सर्व प्रवाशांकडून नमुने गोळा केले जाणार आहेत.

कोरोना संसर्ग झाल्याचं चाचणीतून स्पष्ट झाल्यास संबंधित प्रवाशाला त्यांच्या घरी किंवा कोरोना केंद्रात किंवा रुग्णालयात दहा दिवसांसाठी विलगीकरणात ठेवलं जाणार आहे. सर्व भारतीय प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.