ठाकरेंच्या सिंहासनाला धक्का देणाऱ्या शिंदेंची कहाणी : शिंदे साहेब राज्यातील सगळ्यात शक्तिशाली नेते कसे बनले ?

ठाणे – तारीख २० जून…  राज्यात विधानपरिषदच्या १० जागांसाठी मतदान होत होत. शिवसेनेचे २ काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादीचे २ उमेदवार रिंगणात होते.  कागदावर स्ट्रॉंग असणाऱ्या महाविकास आघाडीला निवडणूक तशी अगदी सोपी होती. मात्र भाजपने (BJP) देखील ६ उमेदवार रिंगणात उतरवले आणि इथंच महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्याची तयारी सुरु झाली. पाच वाजता निकाल लागणार होता. पण काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्षण जगताप (BJP MLA Mukta Tilak and Laksh Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. आणि नेमकं याच मधल्या वेळेत ठाण्याच्या किल्लेदाराच्या गेमला खरी सुरवात झाली. हा ठाण्याचा किल्लेदार म्हणजे एकनाथ भाई शिंदे ….

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड करत तब्ब्ल ४० आमदार पळवले आहेत. हे आमदार मुंबई – सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आहेत. मुंबईत मतदानासाठी आमदार एकत्र आले आणि एकनाथ शिंदेंनी आपल्या गेमला सुरवात केली. सुरवातीला शिवसेनेचे १७ आमदार सोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आमदारांचा पाठिंबा मिळालाय. ठाकरे ब्रॅण्डच्या शिवसेनेत एवढे मोठे बंड कसे झाले ? एकनाथ शिंदे खरंच एवढे मोठे नेते आहेत का ? त्यांच्या मागे अख्खी शिवसेना कशी गेली ? या सगळ्या प्रश्नाची उत्तर शोधायची असतील तर आपल्याला थेट धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या ठाण्याच्या ‘येड्या खोपडीच्या’ कार्यकर्त्याला शोधावं लागेल. हा कार्यकर्ता म्हणजे एकनाथ शिंदे.

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 महाबळेश्वर जवळील डेरे गावाचा. शिक्षणासाठी ते ठाण्याला पोहचले. पण घरची परिस्थिती अतिशय हलाखीची त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. नंतर वयाच्या १८ व्या वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980 च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरर्निवाह करत होते. 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली.

अशात शिवसेनेचे बेळगाव सीमा प्रश्नावर आंदोलन सुरु झाले. सेनेचे अनेक बडे नेते या आंदोलनात जेलमध्ये गेले होते. बाळासाहेबांनी ठाण्याच्या या तरुणाला बेळगाव सीमेवर पाठवले आणि शिंदेंचं वादळ तिथं देखील तितक्याच तीव्रतेने घोंगावलं. या सीमा आंदोलनात त्यांना तुरुंगवास देखील झाला.

त्याकाळात ठाण्यात मोठ्या प्रमाणात डान्सबार चालायचे या डान्सबारने फक्त ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शेतकरी आपल्या जमिनी विकून पैसे ठाण्यातील डान्सबार मध्ये उधळायचे. शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी होत असताना शिवसेनेचा त्यावेळचा तरुण शेतकरी नेता आणि आताचे कृषिमंत्री दादा भुसे हीच तक्रार घेऊन थेट आनंद दिघे यांच्या दरबारात पोहचले. याचवेळी ठाण्यातील लक्ष्मी नगर या ब्राम्हण वसाहतीतील नागरिक देखील डान्सबारच्या मुलींची आणि त्यांच्या मागे येणाऱ्या गुंडांची तक्रार घेऊन आनंद दिघे यांच्या दरबारात होते. डान्सबार होते शेट्टी या बड्या असामीचे… त्या शेट्टींचे हाथ मंत्रालयापासून ते पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत पोहचलेले. आनंद दिघेंना प्रश्न पडला या डान्सबार वाल्यांची दहशत मोडण्यासाठी कोणाला पाठवावं. समोर कोणीच दिसत नव्हत त्यावेळी दिघेंना कोणीतरी सटकलेल्या खोपडीचा माणूसच या कामासाठी हवा होता. दिघेंच्या नजरेत लगेच त्यांच्यासारखाच दाढीवाला आला. आणि त्यांनी बाजूला असणाऱ्या राजन साळवींना दिघे स्टाईल मध्ये दाढीवरून हात फिरवत विचारलं एकनाथ कुठाय ?  दिघे साहेबांनी आठवण काढली म्हंटल्यावर एकनाथ शिंदे काही क्षणातच टेम्भी नाक्यावर पोहचले. आणि त्याच रात्री शेट्टीचा डान्सबार आणि शेट्टी या दोघांचा देखील एका दणक्यात निकाल लावला. यामुळे डॅशिंग शिंदे यांची ओळख अख्य्या ठाण्याला तर झालीच पण लक्ष्मी नगर या ब्राम्हण वसाहतीत पहिली शिवसेनेची शाखा देखील उघडली.

मात्र २००० साली शिंदेंच्या जीवनात असं वादळ आलं की त्यांनी राजकारण तर सोडलंच होत पण ते आत्महत्या करण्याच्या देखील विचारात होते. तारीख होती. २ जून २००० एकनाथ शिंदे आपल्या परिवारासोबत महाबळेश्वरला सुट्टीसाठी गेले सोबत मोठा मुलगा १४ वर्षाचा श्रीकांत, ११ वर्षाचा दीपेश आणि ७ वर्षाची चिमुकली शुभदा होती. एकनाथ शिंदे महाबळेश्वर येथील तापोळा गावात होते. येथील कोयना नदीत खेळात असताना शुभदा आणि दीपेश यांचा बुडून मृत्यू झाला. एकनाथ शिंदे या दुःखद घटनेने पुरते कोलमडले होते. त्यांनी त्यावेळी १० दिवस स्वतःला एखा खोलीत बंद करून घेतले होते. आत्महत्येचा विचार त्यांच्या डोक्यात आला. यातून त्यांना आनंद दिघे यांनी बाहेर काढलं आणि कामात व्यस्त राहण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सभागृह नेते पदी बसवलं. सलग तीन हे वर्षे पद त्यांनी सांभाळले. 2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा ते आमदार झाले. 2005 साली शिवसेनेचे ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. 2014 साली विधानसभेसाठी विजयाची हॅटट्रिक केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जानेवारी 2019 मध्ये आरोग्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली. पुढे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री देखील झाले.

मात्र कट्टर हिंदुत्ववादी (Hardcore pro-Hindu) आनंद दिघे यांच्या मुशीत घडलेल्या शिंदेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत झालेली अनैसर्गिक आघाडी काही केल्या रुचत नव्हती. राहून राहून एकनाथ शिंदे नाराज असलेलच्या बातम्या येतच होत्या. त्याच कारण देखील तसेच होते. शिवसेनेत मुख्यमंत्री पदासाठी १ नंबरचा चेहरा एकनाथ शिंदे होते. मात्र एकीकडे स्वतः पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसावं लागलं. अखेर एकनाथ शिंदे यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान देत हिंदुत्वासाठी पुन्हा भाजप बरोबर चला म्हणून हाक दिली. आणि एकनाथ भाईंच्या हाकेला सेनेतील ४० आमदारांनी साद दिली. ४० आमदार सोबत येण्यासाठी शिवसेना आरोग्य कक्षातून त्यांनी केलेलं काम असो वा त्यांच्या घराचे दरवाजे सगळ्याच शिवसेनेसाठी कायम खुले असूदेत हेच मुख्य कारण आहे. आता एकनाथ शिंदेंचे हे बंड यशस्वी होते की नाही हे पाहण्यासारखं आहेच पण पण शिवसैनिकांचे लाडके शिंदे साहेब हे राज्यातील सगळ्यात शक्तिशाली नेते म्हणून पुढे आलेत हे मात्र नक्की.