‘हा’ अधिकारी दहशतवादी ओसामा बिन लादेनला मानतो गुरु; ऑफिसमध्ये लावला फोटो

फारुखाबाद – उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एक अधिकारी जगातील सर्वात भयंकर दहशतवादी ओसामा बिन लादेनला (Terrorist Osama bin Laden) आपला गुरू सांगत आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा फोटो त्यांच्या कार्यालयात लावला आहे.

हे संपूर्ण प्रकरण फरुखाबाद येथील नवाबगंज येथील विद्युत महामंडळ कार्यालयातील (Electricity Corporation Office) आहे. दहशतवादी ओसामा बिन लादेनचा ऑफिसमधील फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ओसामा बिन लादेन जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता होता असं देखील कार्यालयातील ओसामाच्या चित्राखाली लिहिलेले आहे. या खाली एसडीओ रवींद्र प्रकाश गौतम (SDO Ravindra Prakash Gautam) यांचे नाव आहे.

अधीक्षक अभियंता एसके श्रीवास्तव (SK Srivastava) यांनी याबाबत सांगितले की, त्यांनाही याची माहिती मिळाली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. फर्रुखाबाद येथील नवाबगंज विद्युत निगम कार्यालय संकुलातील प्रतीक्षालयाच्या भिंतीवर ओसामा बिन लादेनचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवाबगंजच्या विद्युत निगम कार्यालयाच्या भिंतीवर ओसामाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची माहिती इतर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर हा फोटो काढून टाकण्यात आला आहे.

त्याचवेळी या प्रकरणी उपविभागीय रवींद प्रकाश गौतम यांना फोन केला असता त्यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेन हा आमचा गुरू असल्याचे सांगितले. फोटो काढून टाकल्यास, तो पुन्हा लावला जाईल असं त्यांनी सांगितले.