सोने खरेदीपासून पॅन-आधार लिंकपर्यंत अनेक नियम बदलणार; 1 एप्रिलपूर्वी पूर्ण करा ‘ही’ कामे

Rules Changes From April 1, 2023: प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक बदल होतात. या बदलांचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर तसेच त्याच्या दैनंदिन जीवनावर होतो. मार्च महिना संपायला अजून 15 दिवस बाकी आहेत. अशा स्थितीत अनेक महत्त्वाची कामे आहेत जी तुम्ही 31 मार्चपूर्वी पूर्ण केली पाहिजेत. 1 एप्रिल 2023 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे मार्चमध्ये महत्त्वाची कामे पूर्ण न केल्यास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याच वेळी, तुमच्या बजेटवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

या बदलांमध्ये आधार-पॅन लिंकपासून (Aadhar-Pan Card Link) ते गॅस सिलिंडरच्या किमती (Gas Cylinder) आणि बँकांच्या सुट्ट्या (Bank Holiday) इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे. 1 एप्रिलपासून होणार्‍या या बदलांबद्दल तुम्हाला आधीच माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचे सर्व काम 31 मार्च 2023 पूर्वी पूर्ण करू शकता. यानंतर तुम्हाला या बदलांची काळजी करण्याची गरज नाही.

सोने खरेदीच्या नियमांमध्ये बदल
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या की 1 एप्रिलपासून ते बदलणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 31 मार्च 2023 नंतर, हॉलमार्क म्हणून चार अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) असलेले दागिने विकले जाणार नाहीत. 1 एप्रिल 2023 पासून केवळ सहा अंकी हॉलमार्क चिन्ह असलेले दागिने विकले जातील. 4 आणि 6 अंकी हॉलमार्किंगच्या गोंधळाबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्राहक मंत्रालयाने सांगितले.

पॅन कार्ड आधारशी लिंक करा
जर तुम्ही अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर लगेच करा. तुम्ही असे न केल्यास तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. सेबीने जाहीर केले आहे की पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. अन्यथा, पॅन कार्ड निरुपयोगी होईल.

गॅसच्या किमती
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमती बदलतात. मात्र, फेब्रुवारीमध्ये गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 284 रुपयांची वाढ झाली आहे.