शिवसेनेचा ‘हा’ आमदार खंडणी घेतो, पक्षातील नेत्याचेच गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

अकोला : अकोला जिल्हा शिवसेनेतील वाद काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेचे अकोल्याचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी पक्षाचे आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर थेट खंडणीचे आरोप लावले आहेत.

आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर आहेत. जिल्ह्यात खंडणी वसुलीत आमदार देशमुख सर्वात समोर असल्याचा आरोप पिंजरकरांनी पत्रात केला आहे. जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले असल्याचा पिंजरकरांचा आरोप आहे.

जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपाशी संधान साधत असल्याचा पिंजरकर यांनी गंभीर आरोप केला आहे. सोबतच नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने नेमणुका करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.