नृत्याचा उपयोग करून व्याधींवर उपचार; पुणे विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम

पुणे – नृत्याचा उपयोग करून अनेक व्याधींवर उपचार केले जातात, यावर आधारित अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संचेती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सायली अगावणे हिचा मॉडर्न विकास मंडळाच्या वतीने डॉ. करमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सायली कथक नृत्यांगणा (दिव्यांग) असून, ती दिव्यांग मुलांना नृत्य शिकविते.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे, नृत्य गुरु शमाताई भाटे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सायलीचे पालक नंदकिशोर आणि मनिषा अगावणे, बहिण जुईली सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. करमळकर पुढे म्हणाले, विद्यापीठात समाजाचे प्रतिनिधित्व असले पाहिजे. त्यासाठी सामाजिक उपक्रमात सहभाग आवश्यक वाटतो. समाजाचे प्रश्न समजतात, ते हाताळता येतात, त्यांच्यावर संशोधन करता येते. समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांची मानसिकता बदलली पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.

पांडे म्हणाले, जगण्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारून भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी अशाप्रकारचे सत्कार समारंभ प्रेरणादायी ठरतात.

भाटे म्हणाल्या, नृत्यामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विकसित होते. व्यक्तिमत्व विकसित होते, व्यायाम होतो, आनंद मिळतो. त्यामुळे मुलांना नृत्यकला शिकविणे आवश्यक आहे. कलेबाबत मुलांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे.  डॉ. बुटाला यांनी प्रास्ताविक आणि अजित वाराणशीकर यांनी सूत्रसंचालन केले.