‘मौलाना शरद पवारांचा ‘जुम्मा’ असल्याने Non-Veg खाल्ल्याचं सांगून दगडूशेठच्या मंदिरात जाणं टाळलं’

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला (Rich Dagdusheth Halwai Ganpati Mandir) भेट दिली. मंदिर परिसरात येणा-या भाविक महिलांकरीता स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष, प्रथमोपचार सुविधा परिसरात कशा प्रकारे उपलब्ध होईल, याविषयी यावेळी चर्चा देखील झाली. त्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शरद पवार यांनी गणरायाचे मुखदर्शन घेतल्यानंतर शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा ट्रस्टतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.

शुक्रवारी दुपारी शरद पवार, दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांसह अनेक मान्यवरांनी या परिसराला भेट दिली. सुरुवातीला मंदिरासमोर असलेल्या भिडे वाडयाची पाहणी करुन सर्व मान्यवरांनी मंदिराच्या मागील बाजूस गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीसमोरील जागेची पाहणी करुन तेथील अडचणी समजून घेतल्या. मंदिर परिसरात येणा-या भाविक महिला, लहान मुले यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेत त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

शरद पवार या ठिकाणी आले तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांकडून शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या समर्थकांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मात्र पवार यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. यामागील कारणाचा खुलासा राष्ट्रवादीनेच केलाय.

पवार यांनी मंदिरामध्ये जाण्याचं का टाळलं यासंदर्भात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “शरद पवारांनी मांसाहारी जेवण (Non_veg) केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितलं,” अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका केली.आज आपल्याला दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जायचे आहे, हे माहिती असूनही शरद पवार यांनी नॉनव्हेज कसं खाल्लं? शरद पवार यांची हिंदू देवी-देवतांवर श्रद्धाच नाही. त्यामुळे ते मंदिरात जातीलच कसे? मौलाना शरद पवार यांचा काल जुम्मा होता, त्यामुळेच त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचे कारण देत मंदिरात जाण्यास नकार दिला. एरवी शरद पवार हे इफ्तार पार्ट्या झोडत फिरत असतात. पण दगडुशेठच्या मंदिरात जाण्याची पवारांना एलर्जी आहे. त्यांनी कितीही कारणे दिली तरी शरद पवार हे नास्तिक आहेत, ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याचे तुषार भोसले यांनी म्हटले. त्यामुळे आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.