माजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख कामचुकार; राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आघाडीचा हल्लाबोल

Pune – राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीनं माजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP)अमित देशमुखांवर निष्क्रिय, अकार्यक्षम, अरसिक अशा ‘शेलक्या’ शब्दांत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका निवेदनाद्वारे अमित देशमुखांवर (Amit Deshmukh) अनेक गंभीर आरोप लावले आहेत.

बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) निवेदनात म्हणतात की, ‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असतांनाच्या अडीच वर्षात या सरकारने अतिशय लोकाभिमुख कारभार केला. मात्र, दुर्दैवानं सरकारातील काँग्रेसचे तत्कालिन सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख मात्र याला अपवाद होते. गेल्या अडीच वर्षात सांस्कृतिक खातं पुर्णपणे निष्क्रिय होतं. कारण या खात्याला मिळालेल्या अमित देशमुख सारख्या अरसिक आणि अकार्यक्षम मंत्र्यामुळे कलावंतांचे खूप मोठे नुकसान झाले .

या निवेदनात राष्ट्रवादी चित्रपट विभागानं कलाकारांच्या विविध प्रश्नांविषयी केलेल्या प्रयत्नांची ‘जंत्री’च सादर करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे अमित देशमुखांनी कसं दुर्लक्ष केलं याचा ‘पाढा’च वाचण्यात आला आहे़. मराठी चित्रपटला उद्योगाचा दर्जा देण्यासाठीची धडपड असो किंवा वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवून देण्याच्या प्रक्रियेकडे माजी सांस्कृतिक मंत्र्यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. यासोबतच मुंबईमध्ये कलाकार भवन उभे करणे, लोककलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या राष्ट्रवादीच्या मागणीसंदर्भात अजितदादा (Ajit Pawar)आणि सुप्रियाताईंनी (Supriya Sule) दखल दिल्यानंतर अमित देशमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलंय.

गेल्या अडीच वर्षांत अमित देशमुखांनी कलावंतहिताचे कुठलेही निर्णय न घेतल्यामुळे गेल्या अडीच वर्षात अनेक कलावंतांना विविध योजनांपासून वंचित रहावं लागल्याचं आरोप राष्ट्रवादी चित्रपट विभागानं केला आहे. कोरोना काळामध्ये 56 हजार कलाकारांना त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील अमित देशमुखांमूळेच फोल ठरल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. यासोबतच वृद्ध कलावंतांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव, मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भात निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा यांनी मार्गी लावला होता. मात्र, अमित देशमुख यांच्या कार्यालयाकडे कलावंताच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आणि मराठी चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव धुळखात पडून राहिल्यामुळे हे प्रश्न तसेच राहिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीनं अमित देशमुखांवर केला आहे. महाविकास आघाडीसरकारच्या काळात राज्यातील कलावंतांचं नुकसान होण्याला अमित देशमुखच कारणीभूत असल्याचं राष्ट्रवादी चित्रपट विभागानं म्हटलंय.

ज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्या कार्यशैलीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय. विलासराव देशमुख कायम छोट्या-मोठ्या कलाकारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहायचे. मात्र, आपल्या वडिलांचा वारसा सांगणाऱ्या अमित देशमुखांनी कायमच कलाकारांवर अन्यायाची भूमिका घेतल्याचा टोला राष्ट्रवादीनं अमित देशमुखांना लगावला आहे.