बिग ब्रेकिंग! जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन

पुणे: हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. आज दुपारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वृषाली गोखले आणि मुलगी आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील २-३ दिवसांत त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीबरोबरच राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असत. विक्रम गोखले यांनी अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे.

विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले.