‘त्या’ तरुणीने अखेर रघुनाथ कुचिक यांच्यावरील आरोप मागे घेतले; राजकीय दबाव की आणखी काही ? 

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने आता त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत.

पीडित मुलीने आज पुणे न्यायालयात मॅजिस्ट्रेटसमोर Section 164 crpc प्रमाणे पुन्हा एकदा जबाब नोंदवला. यात पीडित मुलीने रघुनाथ कुचिक यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि त्यांच्या माणसांनी मला दमदाटी करत कुचिक यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यास भाग पाडलं असं या पीडित तरुणीने सांगितलं आहे.

पीडित तरुणीने हा जबाब नोंदवल्यानंतर पुणे पोलीस (Pune Police) आता या प्रकरणाचा नव्याने तपास करणार असून यात चित्रा वाघ यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रघुनाथ कुचिक यांनी पीडिताला कधीच आत्महत्या करायला सांगितले नव्हते, असा व्हाट्सएप्प मेसेज सुद्धा कुचिक यांनी कधी केला नसताना चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या माणसांनी आपल्याला असे मेसेज आल्याचं पोलीस आणि मीडियाला सांगायला भाग पाडलं असं या पीडित तरुणीने सांगितलं आहे. ‘मुंबई तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तरुणीनं तक्रार दाखल केली होती. लग्नाच्या भूलथापा देऊन कुचिक यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसंच गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अचानक अशा पद्धतीने या प्रकरणाने वळण घेतल्याने आता हे सर्व राजकीय दबावातून घडत आहे  कि आणखी काही यामागे आहे याबाबत नागरिक कुजबुज करत आहेत.