“भुजबळ बोलले ती वस्तुस्थिती, आता शब्द मागे घेतले तर त्यांना ‘बळ गेलेली भुजा’ म्हणावे लागेल”

वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्यासाठी कुप्रसिद्ध असणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना भुजबळ यांनी जातीयवादी टीका करत ते किती जातीयवादी आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ ?
“संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दाम संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

भुजबळांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खोचक टीका केली आहे. भुजबळ बोलले ती वस्तुस्थिती आहे. ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहतील, शब्द फिरवणार नाहीत वा मागे घेणार नसतील तर त्यांना खरे भुजबळ म्हणावे लागेल. नाहीतर बळ गेलेली भुजा असे म्हणावे लागेल, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. भुजबळ सत्तेत राहून असे बोलत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू. बहुजनांचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, असेही वडेट्टीवार म्हणाले.