विराट कोहली आरसीबी सोडून ‘या’ संघांसोबत जाणार? माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीला (RCB) दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच आरसीबीचे प्लेऑफचे आव्हान संपले. सोळाव्या वर्षीही आरसीबीला आयपीएलच्या चषकापासून वंचित राहावे लागले. सोळावर्षांपासून आरसीबीचे चाहते चषकाची वाट पाहत आहेत. प्रत्येकवेळा चषकाच्या जवळ जातात. पण विजय मिळवण्यात अपयश येते असेच काहीसे चित्र दरवर्षी पाहायला मिळते.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व घडत असताना आता माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनच्या (Kevin Pietersen) वक्तव्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडच्या माजी खेळाडूने विराट कोहलीला (Virat Kohli) आरसीबी सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्याने ट्वीट करून त्याने हा सल्ला विराटला दिला आहे.

“आता विराट कोहलीने कॅपिटल सिटीसाठी खेळण्याची वेळ आली आहे.” असं ट्वीट करत हॅशटॅग आयपीएल केलं आहे. केविन पीटरसनने विराट कोहलीला आरसीबी सोडून दिल्लीसोबत खेळण्याचा सल्ला दिला आहे.विशेष म्हणजे केविन पीटरसन हा विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे.