मोदींच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर येताच वागळेंनी उडवली खिल्ली; म्हणाले….

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुंबई शाखेला एक ई-मेल आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचे २० गट (Sleeper cells) सक्रिय झाल्याचे या ई-मेलमध्ये म्हटले. मात्र, ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव उघड केलेले नाही. परंतु, आरडीएक्सच्या साहाय्याने स्फोट घडवून पंतप्रधान मोदींना घातपात करण्यात येईल, असे या मेलमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे आपली ओळख उघड होऊन हा कट फसू नये, यासाठी ई-मेल केल्यानंतर आपण आत्महत्या करणार असल्याचेही संबंधित व्यक्तीने सांगितले आहे. ई-मेलमध्ये म्हटल्याप्रमाणे हल्ल्याची संपूर्ण योजना तयार झाली आहे. हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. सध्या हा ई-मेल कुठून आला आणि मेल पाठवणारी व्यक्ती कोण, याचा कसून शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर या घटनेची जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, हाहाहा! जनक्षोभ उसळणार असं दिसल्यावर नेहमीच यांचे हे स्टंट सुरु होतात. गुजरातपासून ही युक्ती वापरली जातेय. नवं काही तरी काढा आता! असं वागळे यांनी म्हटले आहे.