माझ्या बोलण्यावर बंधने आणण्यासाठी वानखेडेंची हायकोर्टात धाव – मलिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पोलखोल सत्र सुरु ठेवले आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती माध्यमांसमोर मांडली. समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खोट्या प्रकरणांमध्ये अनेक लोकांना तुरुंगात टाकले, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

नवाब मलिक यांनी माध्यमांपुढे आणि ट्विटरवर आपली भूमिका व्यक्त करु नये यासाठी वानखेडे यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. हा अधिकारी स्वत:ला कोण समजतो? अशा तीव्र शब्दात मलिक यांनी त्यांचा समाचार घेतला. देशातील नागरिकांचा बोलण्याचा मौलिक अधिकार वानखेडे हिरावून घेऊ शकत नाहीत. कोणाच्याही बोलण्याला आणि लिखाणाला रोखणे म्हणजे स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.

तसेच काही दिवसांपूर्वी वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. आज तोच अधिकारी मुंबई पोलिसांविरोधात हायकोर्टात अविश्वास दाखवत आहे. यातून त्यांची भीती स्पष्टपणे समोर येत आहे, असेही मलिक यांनी सांगितले.