निर्दयीपणाचा कळस! iPhone घेण्यासाठी जोडप्याने विकलं पोटचं बाळ, उरलेल्या पैशातून हमीमूनलाही गेले

Child Sold For iPhone: पश्चिम बंगालमधील एका जोडप्याने आयफोन घेण्यासाठी आपले ८ महिन्यांचे बाळ विकले आहे. मुलाला विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून केवळ आयफोन खरेदी केला नाही, तर या जोडप्याने त्यांच्या हनिमूनसाठीही हे पैसे वापरले. ही घटना उत्तर २४ परगणामधील पाणिहाटीमधील गांधीनगर भागातील आहे.

रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याला रील बनवण्याचा शौक होता. त्यासाठी महागडा फोन घेण्याच्या इच्छेने या जोडप्याने आपल्या हृदयाच्या तुकड्याचा व्यापार केला. वृत्तानुसार, गांधीनगरमधील आरोपी आणि मूल विकत घेतलेल्या महिलेविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदेव चौधरी आणि साथी चौधरी नावाच्या दाम्पत्याला ७ वर्षांची मुलगी आणि ८ महिन्यांचा मुलगा आहे. रविवारी (२४ जुलै) ही घटना उघडकीस आली, मात्र हे प्रकरण दीड महिना जुने असल्याचे बोलले जात आहे. तक्रारीनंतर कारवाई करत पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेतले तसेच मुलाला विकत घेतलेल्या प्रियांकाच्या ताब्यातून बाळाची सुटका केली.

एका शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने आपले मूल 2 लाख रुपयांना विकले होते. मूल विकून मिळालेल्या पैशातून आधी आयफोन खरेदी केला, नंतर हनिमूनसाठी दिघा व इतर ठिकाणी गेला. दुसरीकडे, जयदेवचे वडील कामई चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाने नातवाबद्दल सांगितले होते की, त्याला त्याच्या मामाच्या घरी पाठवले आहे. नंतर मला कळले की मूल विकले गेले आहे. आरोपी जयदेवच्या वडिलांनीही त्यांचा मुलगा आणि सुनेवर छळ केल्याचा आरोप केला आहे.