मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या कंपनीला विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहेत ?

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे.

काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई होत असताना एक नाव सातत्याने चर्चेत येतंय आणि ते नाव म्हणजे श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी यांचं.

चतुर्वेदी हे जवळपास दोन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करत असल्याचं समोर येतंय. यातल्या बहुतेक कंपन्या शेल कंपन्या असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे मुंबईतल्या एकाच पत्त्यावर चतुर्वेदीच्या 19 कंपन्या रजिस्टर्ड आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी पेशाने सीए असल्याचं सांगितले जाते.

त्यांनी मुंबई, कोलकाता आणि दिल्लीमध्ये विविध ठिकाणी शेल कंपन्यांची स्थापना केली असून या शेल कंपन्यांच्या माध्यमातून 15 ते 20 वर्षांपासून काळा पैसा पांढरा करण्याचं काम करतात असा आरोप आहे.चतुर्वेदी यांच्या बीकेसीतील एका भूखंडाच्या व्यवहाराची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. मार्च 2021 पासून ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदी यांची चौकशी सुरु आहे. चतुर्वेदी मे 2021 पासून आफ्रिकेच्या एका देशात वास्तव्यास असल्याची सूत्रांची माहिती आहे.