महाराष्ट्राच्या वाघिणीला भाजप पुन्हा ताकद देणार का ?

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 9 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस होऊ शकते.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील.

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने आता भाजपच्या आक्रमक नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि राज्यात तापलेल्या ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांची राज्यातील पक्षनेतृत्वाविषयीची नाराजीही सातत्याने बोलून दाखवत आपल्या मनातील राग आणि खदखद व्यक्त केली आहे. यावेळी त्यांना डावलणे हे पक्षाला न परवडणारे आहे कारण आगामी निवडणुका तसेच आगामी काळातील राजकारण पाहता पंकजा मुंडे या पुन्हा मैदानात आल्या तर विरोधकांची दाणादाण उडू शकते असं जाणकारांचे म्हणणे आहे.